मुरूम (प्रतिनिधी): महावितरणच्या मुरूम शहर शाखेमार्फत स्मार्ट मीटर बाबत अधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने तसेच वीज बिल तक्रार निवारणासाठी नुकतेच (दि.६ जुलै) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वीज ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वीज बिलासंदर्भातील विविध तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात येत आहे.

शिबिरामध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे विविध फायदे, अचूक व पारदर्शक वीज वापर नोंद, तसेच बिलिंग प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. याशिवाय स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील विविध शंका व गैरसमज दूर करून वस्तुनिष्ठ माहितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

यावेळी उमरगा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. रेकुलवाड यांनी ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटर ही भविष्यातील आधुनिक व पारदर्शक वीज वितरण व्यवस्थेतील महत्त्वाची पायरी असल्याचे सांगितले. तसेच सहायक लेखापाल श्री. मुळे व लिपिक श्री. राठोड यांनी उपस्थित ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचे निराकरण केले व आवश्यक मार्गदर्शन केले.

महावितरणतर्फे सर्व वीज ग्राहकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या वीज बिलासंदर्भातील समस्या सोडवून घ्याव्यात तसेच स्मार्ट मीटरबाबत अधिकृत व योग्य माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे समाधान करण्याच्या महावितरणच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top