तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी प्रकल्पात अवघा 12 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आणि यंदा पावसाने ओढ दिल्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुढील 15 दिवसांसाठी शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि. 1 जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत शहरातील वाढती पाणीटंचाई, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली. पावसाचा पुढील अंदाज आणि परिस्थिती लक्षात घेऊन 15 दिवसांनंतर पाणीपुरवठ्याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार कपातीचे दिवस वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सभेत पाचुंदा तलावात सुमारे 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या पर्यायावरही चर्चा करण्यात आली. तसेच रामदारा तलावातील पाणी तुळजापूर शहरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी डीपीडीसीच्या दुष्काळ निवारण योजनेअंतर्गत 2024-25 व 2025-26 या आर्थिक वर्षातील प्रलंबित निधी उपलब्ध झाल्यानंतर रामदारा तलावातून शहराला पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले. भविष्यात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्याबाबतही सभेत सकारात्मक चर्चा झाली.
पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून शहरातील सर्व नळांना तोट्या (टॅप) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष विनोद गंगणे, गटनेते औदुंबर कदम, गटनेते अमोल कुतवळ, पाणीपुरवठा सभापती सागर कदम तसेच उपस्थित नगरसेवकांनी केले. दरम्यान, पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर शहरातील पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत असून, नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.