धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध आर्ट डिझायनर ख्वाजाभाई मौलासाहेब सय्यद यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या बळावर राज्याच्या साहित्यविश्वात पुन्हा एकदा वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित 'तुकाराम' या बहुचर्चित कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे आरळी बुद्रुकसह तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्याच्या कला-वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण मातीतून उभारी घेत राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ख्वाजाभाई सय्यद यांनी गेल्या अनेक वर्षांत साहित्य, चित्रपट, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रासाठी शेकडो दर्जेदार कलाकृती, लोगो, पुस्तकांची मुखपृष्ठे आणि संकल्पनात्मक डिझाईन्स साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, आधुनिकता आणि प्रभावी दृश्य मांडणीचा उत्कृष्ट संगम दिसून येतो.

आता त्यांनी साकारलेले 'तुकाराम' कादंबरीचे मुखपृष्ठ साहित्यविश्वात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या कादंबरीचे लेखक शफी पठाण असून, प्रसिद्ध साहित्यिक शरद तांदळे यांच्या न्यू इरा पब्लिकेशन, पुणे तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन 17 जुलै रोजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 



विविध क्षेत्रांत कलाकृती साकारण्याची संधी

आजपर्यंत मला संगीत, कला, क्रीडा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आहे. भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांसाठी कलाकृती साकारल्या. तसेच टी-सीरिज, सारेगामा यांसारख्या नामांकित संस्थांसाठीही डिझाईन करण्याची संधी लाभली. प्रत्येक कलाकृतीत विषयाचा आशय, व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आणि कलात्मक दर्जा जपण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आयएएस तुकाराम मुंडे यांच्या जीवनावरील 'तुकाराम' कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

 ख्वाजाभाई मौलासाहेब सय्यद

 
Top