भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी असलेला पोषण आहार खाजगी वाहनधारकाला विक्रीसाठी देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दि.19 जुलै रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. गावातील ग्रामस्थांनी हा प्रकार रंगेहाथ पकडत संबंधित प्रशासनाला माहिती दिल्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर (ढगे) येथील अंगणवाडी क्रमांक 507 मधील अंगणवाडीतील पोषण आहार एमएच 14 एचजी 0252 क्रमांकाच्या खाजगी वाहनात भरत असल्याची तक्रार बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश तुकडे यांनी कर्मचारी इंगळे यांच्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, अंगणवाडीतील पोषण आहाराचा साठा खाजगी वाहनात तसेच रस्त्यावर आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा आहार अंगणवाडी केंद्रात नोंदणीकृत गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी मुली तसेच इतर पात्र लाभार्थ्यांना वितरित न करता अनधिकृतपणे बाहेर काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्रशासनाने दिली.


 
Top