तुळजापूर  (प्रतिनिधी)- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणअभियानांतर्गत तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या  फॉर्म शिबिराला प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून मतदार नोंदणी, मतदार यादी अद्ययावत करणे आणि मतदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका  प्रियांका ताई विजय गंगणे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना  फॉर्मचे वाटप केले. तसेच अनेक नागरिकांचे फॉर्म भरून देत आवश्यक मार्गदर्शनही केले. यावेळी बीएलओ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे, किरण हत्तीकर, बापू वैरागे, विकास शिंदे, महेश औटी, संदीप औटी, विलास रेनके, बालाजी नाईकवाडी, दादासाहेब खपले तसेच विजय सर गंगणे मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे मतदारांमध्ये जागरूकता वाढून लोकशाही अधिक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

 
Top