धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता निर्णायक गती मिळाली आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. आज केंद्रीय विद्यालय विभागीय कार्यालय ऑफिस, मुंबईच्या पथकाने धाराशिव येथे भेट देऊन केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी केली.

यावेळी केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त ए. सी. पाटील, के. व्ही.भांडुपचे प्राचार्य ए.सी.राजपूत आणि के.व्ही. सोलापूरचे प्राचार्य उमाकांत जोशी यांनी प्रस्तावित जागेची पाहणी करून उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती घेतली. चालू लोकसभा अधिवेशनात 9 जुलै 2026 रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न क्रमांक 102684 उपस्थित करून धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नाचे उत्तर 27 जुलै 2026 रोजी केंद्र सरकारकडून लोकसभेत दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभेत 27 जुलै रोजी देण्यात येणाऱ्या उत्तरामध्ये धाराशिव येथील उपलब्ध स्थानिक जागा, पायाभूत सुविधा आणि केंद्रीय विद्यालयासाठी असलेल्या आवश्यक बाबींची सविस्तर माहिती देता यावी, यासाठी हे पथक आज धाराशिव येथे दाखल झाले. या पथकाने केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची तसेच उपलब्ध आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे, यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यापासून ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने पत्रव्यवहार व बैठका घेऊन केंद्रीय विद्यालय मंजूर करून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता प्रत्यक्ष पाहणीची प्रक्रिया सुरू झाली असून, केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाहणी प्रक्रियेत सहभागी होत केंद्रीय विद्यालयाच्या पथकातील मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. तसेच धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून केंद्रीय विद्यालयाला तातडीने मंजुरी देऊन पुढील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी सोमनाथ गुरव,अमित उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, गणेश जगताप,आकाश कोकाटे,अमित लाटे आणि आकाश कावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल पडले असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धाराशिवच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल.


 
Top