धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 22 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभर “वृक्षारोपण व संगोपन अभियान“ सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित धाराशिव घडविण्याच्या उद्देशाने हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान एक वृक्षरोपण पूर्ण होईपर्यंत हे अभियान अखंडपणे सुरू राहणार आहे.

या अभियानास भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विधान परिषद आमदार बसवराज पाटील तसेच मराठवाडा संयोजक नितीन काळे यांचे मार्गदर्शना नुसार हे अभियान भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.

“हरित धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीचा भरीव वाटा“ हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडळ पदाधिकारी आणि सर्व बूथ प्रमुखांनी किमान एक फळझाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जे मंडळ सर्वात अगोदर वृक्षरोपण प्रत्येक बूथ स्तरापर्यंत  पूर्ण करेल त्या मंडळाचा विशेष सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपणासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मंदिर परिसर आणि शाळा परिसर, तर शहरी भागात मंदिर परिसर, नगरपरिषद शाळांचा परिसर तसेच रुग्णालय परिसर येथे प्रामुख्याने फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात यावे, जेणेकरून झाडांचे योग्य संगोपन होईल आणि त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना दीर्घकाळ मिळेल.

भाजपचे वृक्षारोपण व संगोपन अभियान प्रमुख तथा जिल्हा समन्वयक श्री. दिनेश दत्ता बंडगर यांनी ही माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणारे हे अभियान सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारे ठरणार आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने केवळ झाड लावण्यापुरते न थांबता ते जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी, हीच या अभियानाची खरी प्रेरणा आहे.

भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून “एक बूथ  एक फळझाड  एक जबाबदारी“ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवावा आणि “हरित धाराशिव“ घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहनही अभियान प्रमुख दिनेश दत्ता बंडगर यांनी केले.

 
Top