उमरगा (प्रतिनिधी)-  सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे व स्मार्ट मीटर बंद करावे, लोडशेडिंग बंद करावी आणि सोनम वांगचुक प्रकरणात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उमरग्यात बाळासाहेब ठाकरे चौक येथे आमदार प्रविण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिक, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान राज्यातील वाढत्या जनसमस्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटर योजना त्वरित रद्द करावी, राज्यातील लोडशेडिंग कायमस्वरूपी बंद करावे, सोनम वांगचुक प्रकरणात निष्पक्ष न्याय द्यावा. तसेच नीट, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या. यावेळी आमदार प्रविण स्वामी यांनी शासनावर टीका करत, “जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडेल. नागरिकांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारेल,“ असा इशारा दिला.

यावेळी या चक्काजाम आंदोलनाप्रसंगी अशोक सांगवे, डॉ. अजिंक्य पाटील, विजयकुमार नागणे, सुधाकर पाटील, अजित चौधरी, रणधीर पवार, संतोष कलशेट्टी, विजय ताळभोगे, सिद्धाराम हत्तरगे, किरण कुकुर्डे, धीरज बेळंबकर आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, विद्यार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top