धाराशिव (प्रतिनिधी)- “मोदी सरकार देशाच्या तरुणांना घाबरते, म्हणूनच ते पोलिसांना पुढे करून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवत आहे,“ अशी घणाघाती टीका युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे धाराशिव जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी केली आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, दिल्लीतील जंतर-मंतर येथे ” पेपर लीक घोटाळा, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात शांततापूर्ण मार्गाने 'संसद मार्च' काढणाऱ्या हजारो तरुण-विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व अश्रुधुराच्या हल्ल्याचा युवासेनाच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात येत आहे. हुकूमशाही प्रवृत्तीने देशाच्या भविष्याचा म्हणजेच तरुणांचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे.
NEET सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षांचे पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे. शांततेच्या मार्गाने हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट लाठ्या उगारणे आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेणे, हे देशातील लोकशाही जिवंत नसल्याचे ढळढळीत लक्षण आहे. देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करणाऱ्या आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवण्यास कारणीभूत ठरलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
तरुणांच्या पाठीशी युवासेना खंबीर: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष देशातील आणि राज्यातील प्रत्येक अन्यायग्रस्त तरुणाच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या दडपशाहीविरोधात युवासेना रस्त्यावर उतरून आपला संघर्ष अधिक तीव्र करेल, असे युवासेनेचे वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ॲड. संजय भोरे यांनी म्हटले आहे.
