धाराशिव (प्रतिनिधी)- कृषी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय आळणीच्या कृषीदूतांनी गावात वृक्षारोपण व वृक्षदिंडीचे आयोजन करून कृषी दिन उत्साहात साजरा केला. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे शिल्पकार तथा कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. दिंडीदरम्यान पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि शेती विकासाबाबत जनजागृती करण्यात आली. “एक झाड  एक जीवन“, “झाडे लावा, झाडे जगवा“, “हरित ग्राम, समृद्ध ग्राम“ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर गावातील सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची आवश्यकता तसेच प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी गावातील शेतकरी तसेच गावचे सरपंच अमर शिनगारे, जिल्हा परिषद शाळेचे मुखाध्यापक गवाड सर व सर्व शिक्षक वर्ग कृषी सहाय्यक अधिकारी मगर व तसेच या कार्यक्रमाचे अधिकारी प्रा डॉ शेख व तसेच कृषी दूत सुशील वैध, चव्हाण संदीप, औदुंबर ढेकणे, मयूर भिसे, प्रतीक कांबळे, प्रतीक बनसोडे, प्रतीक सोनवणे,अभिषेक विभुते, रोहित ओवंडकर हे उपस्थित होते. यांनी हा कार्यक्रम संपन्न झाला.


 
Top