धाराशिव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव येथील कामगारांच्या न्याय्य व कायदेशीर मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा घोषित केला.

यावेळी राजाभाऊ राऊत यांनी कामगारांचे प्रलंबित वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), बोनस, ईएसआय, कामगार सुरक्षा, कंत्राटी व हंगामी कामगारांचे नियमितीकरण, समान कामास समान वेतन तसेच इतर कायदेशीर मागण्या पूर्णपणे रास्त असून शासन व संबंधित प्रशासनाने त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली.  या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, उपजिल्हाध्यक्ष महादेव एडके, ज्येष्ठ नेते के. टी. गायकवाड, सुनील वाघमारे, उमाजी गायकवाड, सुजाता बनसोडे, सुलोचना भालेराव, भाऊसाहेब अंदुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज धरणे आंदोलनाचा सलग चौथा दिवस असूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

 
Top