धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महिलांनी केवळ बचत गटांपुरते मर्यादित न राहता त्यांना उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या उद्योजकता उपक्रमाला आता नवे बळ मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून उद्योग उभारणीसाठी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील तब्बल 2 हजार 219 महिलांनी नावनोंदणी केली आहे. त्यातील कर्ज मंजूर झालेल्या 107 महिलांना पैकी कांही महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महिलांना उद्योगासाठी आवश्यक मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांची माहिती आणि आर्थिक सहाय्य मिळावे. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पुढील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 600 महिलांचे उद्योग प्रस्ताव ऑनलाइन दाखल करण्यात आले. या प्रस्तावांची जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर आवश्यक छाननी करून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर संबंधित बँकांकडे कर्जप्रकरणे पाठविण्यात आली. या प्रक्रियेत आतापर्यंत 107 महिलांच्या उद्योग प्रस्तावांना बँकांकडून कर्ज मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आई तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्यात 107 महिलांच्या नवीन उद्योगाचा मार्ग मोकळा झाल्याने महिला उद्योजकतेला नवे बळ मिळाले आहे.
बँकेकडून कर्ज मंजूर झालेल्या महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जी.प. माजी अध्यक्ष नेताजी पाटील ,सतीश दंडनाईक, नगराध्यक्षा नेहाताई काकडे, सरचिटणीस नितीन भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अस्मिता कांबळे जिल्हा अध्यक्षा प्रीती कदम ,नीलकंठ पाटील,सीमा वाकुरे उपस्थित होते.
