धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध, तसेच देशाचे विरोधी पक्षनेते  खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने (दि. 22) निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते हे केवळ एक घटनात्मक पद नसून देशातील कोट्यवधी जनतेच्या आशा, अपेक्षा आणि प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारा आवाज असतो. जंतर-मंतर येथे पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली असता, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व त्यानंतर अटक केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनस्थळावरून राहुल गांधी यांना हटविण्याची आणि अटक करण्याची ही कारवाई केवळ एका नेत्यावरील कारवाई नसून लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर झालेला गंभीर आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागण्यांना उत्तर देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याची टीकाही करण्यात आली.

यावेळी जुलमी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, शहराध्यक्ष धनंजय राऊत, विनोद वीर, प्रशांत पाटील, शीला उंबरे, अग्निवेश शिंदे, मेहबूब पटेल, जयसिंग पवार, अभिषेक बागल, मिलिंद गोवर्धन, जावेद काझी, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, पोपट शिंदे, राजेंद्र राऊत, संकेत पडवळ, महावीर चव्हाण, मन्सूर सय्यद, अभिमान पेठे, सद्दाम काझी, मोईब शेख, धनराज जांगिड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top