धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.डॉ.मनोज भारत डोलारे यांची महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडून धाराशिव जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सोमवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. राज्यभरातील सर्व वनप्रदेशांसाठी 36 वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे, अशी माहिती महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांनी दिली आहे.
प्रा.डॉ मनोज डोलारे हे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत. ते मागील 15 वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत. पक्षी अभ्यासक तसेच वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ते जनमानसात परिचित आहेत. ते जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, बी.एन.एच.एस.चे जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र पक्षीमित्रचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे पक्षीसंवर्धनातील त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, जर्नल्स तसेच अनेक वृत्तपत्रात त्यांचे पर्यावरण, वन्यजीवांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. राज्यस्तरीय वाईल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील त्यांनी पटकावले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची मानद वन्यजीव रक्षक या पदासाठी निवड करण्यात आली आहे.
