मुरूम (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याच्या प्रयत्नांविरोधात मुरूम शहरात आरक्षण बचाव मोर्चा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक, युवक-युवती, महिला व भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. संविधान व सामाजिक न्यायाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करत घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. हा मोर्चा मुरूम शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर मुकेश सोनकांबळे, भालचंद्र लोखंडे, धीरज बेळंबकर, उमेश सुरवसे, विश्वभूषण लिमये, गुरवे सर, एस. के. चेले, दिलीप भालेराव, कैलास शिंदे, दिनेश भालेराव, हरीश डावरे, आनंद कांबळे आदींनी संविधान, सामाजिक न्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आरक्षणाचे महत्त्व या संबंधांनी मार्गदर्शन करताना आरक्षण हे वंचित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे प्रभावी साधन असून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. जाहीर सभा संपल्यानंतर मोर्चाच्या वतीने मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे, आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू देऊ नये आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. या मोर्चा करिता झुंबर बनसोडे, आनंद कांबळे, किरण गायकवाड, सुरज कांबळे, गौतम कांबळे, दिनेश भालेराव, प्रदीप गायकवाड, अभिजीत कांबळे, अजय गायकवाड, गोपी कांबळे, अमोल बनसोडे, जयपाल सुरवसे, राम सागर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. मोर्चाच्या माध्यमातून संविधानाचे संरक्षण, सामाजिक न्यायाची जपणूक आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणावरील उपवर्गीकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नियोजनबद्ध, जनसहभाग आणि मान्यवरांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी झाल्याचे दिसून आले.
