मुरुम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजेंद्र गणापुरे म्हणाले की, 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली, ती ऐतिहासिक घटना लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रातर्फे हा दिवस साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या म्हणजे केवळ आकड्यांची वाढ नसून ती नैसर्गिक संसाधनांवरील मोठा ताण आहे. भारत हा सध्या सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे, लोकसंख्येची संख्या किती आहे, यापेक्षा ती लोकसंख्या किती कार्यक्षम आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
डॉ. गणापुरे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पदव्या घेण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान, कोडिंग आणि डेटा सायन्ससारखी कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. तसेच, कुटुंब नियोजन, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरणाचे रक्षण आणि पाण्याची बचत यांसारख्या सामाजिक जबाबदाऱ्या तरुण पिढीने स्वीकारल्या पाहिजेत. यावेळी मंचावर प्रा. विश्वजीत अंबर, प्रा. डॉ. रविंद्र गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. सुजित मठकरी, डॉ. रमेश आडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री सोमवंशी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुजित मठकरी तर आभार डॉ. रमेश आडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
