धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करून त्यांना महाडीबीटी तसेच विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये नाव, आधार क्रमांक, सातबारा, पीक नोंद, मोबाईल क्रमांक आदींच्या नोंदींमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे पात्र शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजना व अनुदानापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या त्रुटी तातडीने दुरुस्त करून फार्मर आयडीची महाडीबीटी व इतर शासकीय योजनांशी प्रभावी जोडणी करणे आवश्यक आहे.
यासाठी धाराशिव जिल्ह्यात फार्मर आयडी दुरुस्तीची विशेष मोहीम तातडीने राबवावी, तालुका व मंडळ स्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन फार्मर आयडी दुरुस्तीची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
