कळंब (प्रतिनिधी)- कळंब बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात परिवहन विभागाने विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात 'नो पार्किंग झोन' घोषित करण्यात आला असून, या परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
परिवहन विभागाच्या सुरक्षा दक्षता अधिकारी श्रीधर नेहरकर, आगार प्रमुख विजयकुमार घोलप या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करत अनेक वाहनांची तपासणी केली. नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, ही मोहीम पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. बसस्थानक परिसरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई सुरू असून, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
