धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांना अलहाबाद (उत्तर प्रदेश ) येथील जीवरन फाउंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंद आयकॉन ग्लोबल अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला आहे.
प्रा. मारुती लोंढे हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांची 36 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तीन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय स्तरावरील एकूण 63 शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत. ते अनेक वेळा नेट ची परीक्षा उत्तीर्ण असून त्यांनी पीएच.डी व डिलीट पदवी देखील मिळवलेली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठांतर्गत ते पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून देखील कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा आणि नेट सेट या विषयावर त्यांनी अनेक महाविद्यालयांमध्ये व्याख्याने व आकाशवाणीवर मुलाखती दिलेल्या आहेत. त्यांची वळण ही ग्रामीण कादंबरी सुप्रसिद्ध आहे.वर्तमानपत्रांमध्ये ते सातत्याने वेगवेगळ्या विषयावर लेखन करत असतात. सदर पुरस्कार त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,पुस्तक लेखन, संशोधन यासाठी 2026 चा स्वामी विवेकानंद आयकॉन ग्लोबल अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराबद्दल प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
