उमरगा (प्रतिनिधी)- सर्वप्रथम शाळेमध्ये विठ्ठल- रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने कंटेकुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने व गावकरी यांच्या माध्यमातून गावामध्ये भक्तिमय वातावरणात प्रभात फेरी व दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मृदंग, भगवे ध्वज आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमा घेऊन गावातून दिंडी काढली.
“ज्ञानोबा-तुकाराम“, “पांडुरंग हरी“, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल“ अशा गजराने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाचा गजर करत ग्रामस्थांना वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. या प्रभात फेरीत शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी मिळुन विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून समाजात सद्भावना, बंधुभाव आणि चांगले संस्कार रुजावेत, अशी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना होण्यास मदत झाली असून ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक
केले.
