धाराशिव (प्रतिनिधी)- ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात आणि विठूनामाच्या गजरात निघालेल्या आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्यात यंदा बेंबळी (ता. धाराशिव) पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या 'अहिल्यावारी'ने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला सक्षमीकरणाचा अनोखा आणि अत्यंत प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम वारीच्या मार्गावर कौतुकाचा विषय बनला आहे. या उपक्रमामुळे बेंबळी गावाचे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाने झळकत आहे.
भक्तीसोबतच समाजप्रबोधनाची सांगड घालत पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष धनंजय तानले यांनी बेंबळी पंचक्रोशीतील 300 वारकऱ्यांसाठी 'अहिल्यावारी'च्या माध्यमातून एक अत्यंत प्रभावी आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांना वारीच्या पारंपरिक प्रवासासोबतच एका मोठ्या सामाजिक चळवळीचा भाग होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. वारीच्या या सोहळ्यात महिला वारकरी 'अहिल्यासंदेश' देणारे अत्यंत सुंदर फलक हातामध्ये घेऊन आत्मविश्वासाने आणि उत्साहाने चालताना दिसत आहेत. स्त्रीशक्तीचा हा जागर महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला भावुक आणि प्रेरित करत आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर अत्यंत कल्पकतेने आणि सुंदर पद्धतीने एक देखणा रथ तयार करण्यात आला असून, त्यावर केलेली आकर्षक सजावट व संदेश लक्ष वेधून घेत आहेत.
या यात्रेच्या यशस्वीतेसाठी हभप. ज्ञानेश्वर तानले, बिरुदादा वाघुलकर, पांडुरंग डावकरे, नवनाथ तानले, तुकाराम माने, पांडुरंग तिगाडे यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य वारकरी आणि तरुण मंडळी अत्यंत शिस्तीत परिश्रम घेत आहेत.“वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण आहे.“ पुण्यश्लोक फाउंडेशन, धनंजय तानले आणि बेंबळीच्या वारकऱ्यांनी 'अहिल्यावारी'च्या माध्यमातून हाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला असून, विठूरायाच्या दारात पोहोचण्यापूर्वीच या वारीने लाखो भाविकांची मने जिंकली आहेत.

