भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वाल्हा गावचे सुपुत्र, आरोही इंडस्ट्रीजचे चेअरमन, मैत्री ग्रुप, पुणेचे संस्थापक तसेच तळवडे एमआयडीसीमधील उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून ओळख असलेले युवा उद्योजक अमोल अच्युत चोरगे यांना उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा “भारत उद्योग पुरस्कार 2026“ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे भूम तालुक्यासह धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अमोल चोरगे यांचा प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि मेहनतीचे प्रेरणादायी उदाहरण मानला जातो. उद्योगक्षेत्रात त्यांनी सुरुवात एका हेल्पर म्हणून केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शून्यातून उभारलेला उद्योग आज अनेकांना रोजगार देणारा आणि नव्या उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
आरोही इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःचा उद्योग विस्तारला नाही, तर अनेक नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन केले. मैत्री ग्रुप, पुणेच्या माध्यमातून युवकांमध्ये उद्योजकता, स्वावलंबन आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा रुजविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. तळवडे एमआयडीसी परिसरातील अनेक उद्योजकांसाठी ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.
“भारत उद्योग पुरस्कार 2026“ हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून संघर्षावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कष्टकरी युवकाच्या स्वप्नांचा गौरव असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या यशामुळे भूम तालुक्यातील अनेक युवकांना उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. या यशाबद्दल अमोल अच्युत चोरगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
