भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी (महसूल) भूम यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण तसेच 20 जुलै 2026 रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अनागोंदी सुरू असून विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. विशेषतः नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा निषेधही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाई ही लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचा आरोप करत या घटनेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षण व्यवस्था पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, तसेच संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल, भूम न.प.चे नगरसेवक रुपेश शेंडगे, धाराशिव एन एस यु आयचे जिल्हाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद, अल्पसंख्याचे जिल्हा कार्याध्यक्ष समायोदीन काझी, तालुका उपाध्यक्ष भिमराव देशमुख,ॲड. घनश्याम लांवड, माजी नगरसेवक सोपान वरवडे, महमंद पटेल,युवक काँग्रेसचे मोईज सय्यद दत्ता तांबे, अण्णा महानवर, निखील चंदनशिवे, बाळासाहेब देशमुख, लक्ष्मण शिंदे,विकीन तांबे, शफीक शेख यांच्यासह काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
