धाराशिव (प्रतिनिधी)- आषाढी वारीचे औचित्य साधून श्री लिटल चॅम्प प्री. स्कूल, धाराशिव येथे वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला. टाळ, माळ, फेटा, नऊवारी साडी आणि पारंपरिक पोशाखामुळे शाळेचा परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे महत्त्व, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या कार्याची माहिती देत प्रेम, समता, सेवा आणि भक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात अर्णव माळी, हिंदवी निंबाळकर, विराज टिंगरे, वरद इंगळे, विरा भोसले, चैतन्य वाघ, समर्थ बनगया, आरोही माने, ओजस्विनी राऊत आणि शिवांश गायकवाड या विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका स्मिता देशमुख तसेच शिक्षिका ज्योती चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संस्कृती आणि वारकरी परंपरेबद्दल आदर निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
