तुळजापूर  (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सुमारे तेराशे लोकवस्ती असलेल्या कामठा गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात विविध विकासकामांतर्गत  रस्ते करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात ग्रामपंचायतीसमोरीलच रस्त्याची दयनीय अवस्था पाहता “गावातील रस्ते गेले कुठे?“ असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

कामठा हे तालुक्यातील महत्त्वाचे गाव मानले जाते. मात्र गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत रस्ते चिखलाच्या दलदलीत बदलत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्ताच वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शेतीच्या कामासाठी शेतात जाताना, रोजगारासाठी इतर गावांमध्ये प्रवास करताना तसेच तुळजापूर शहरात ये-जा करताना या चिखलमय रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची भीतीही कायम असून, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयासमोरीलच रस्ता अशा अवस्थेत असेल तर गावातील इतर रस्त्यांची परिस्थिती किती गंभीर असेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विकासकामांवर खर्च झालेला निधी नेमका कुठे गेला, रस्त्यांची गुणवत्ता काय होती आणि संबंधित कामांची योग्य पद्धतीने तपासणी झाली का, याबाबतही ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, कामठा गावासह परिसरात करण्यात आलेल्या रस्ते विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतसमोरील चिखलमय रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात प्रत्येक वर्षी नागरिकांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री विकास न दाखवता प्रत्यक्षात दर्जेदार रस्त्यांची उभारणी करावी, अशी अपेक्षा आता कामठा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


 
Top