कळंब (प्रतिनिधी)- अखिल भारतीय छावा संघटना, कळंब शहराच्या वतीने नीट आणि टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी, कळंब यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारत हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यावर उभा असलेला देश असून, अनेक वर्षे परिश्रम करूनही परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे. नीट व टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अमर गायकवाड, प्रशांत कांबळे, शीतल होसेमल्ल, जितेश यादव, सचिन पराटे, अमोल कसबे, आदित्य यादव आणि प्रशांत भराटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
