धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.डॉ.मनोज भारत डोलारे यांची महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडून धाराशिव जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ.डोलारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, केशेगाव गटप्रमुख अहमदभाई पठाण, पंचायत समिती सदस्य लिंबराज साळुंखे, हनुमंत पाटील, मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी लोखंडे करजखेडा, तालुका सदस्य सतीश बनकर, तालुका सदस्य अण्णासाहेब तरंगे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ मनोज डोलारे हे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहेत. ते मागील 15 वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत. पक्षी अभ्यासक तसेच वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ते जनमानसात परिचित आहेत. ते जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, बी.एन.एच.एस.चे जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र पक्षीमित्रचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे पक्षीसंवर्धनातील त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, जर्नल्स तसेच अनेक वृत्तपत्रात त्यांचे पर्यावरण, वन्यजीवांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. राज्यस्तरीय वाईल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम पारितोषिक देखील त्यांनी पटकावले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची मानद वन्यजीव रक्षक या पदासाठी निवड करण्यात आली आहे. वन्यजीवांचे संरक्षण व जंगलांचे संवर्धन यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते. या क्षेत्रात काम केलेल्या, अभ्यास असलेल्या आणि स्वतःची ओळख असलेल्या प्रतिनिधीं मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. वन्यजीव व्यापारावर बंधन आणणे, वनसंवर्धन आणि संरक्षण, लोकसहभाग इत्यादी कामांकरिता वन्यजीव रक्षकांची मदत वन विभाग घेत असते. प्रा.डॉ.मनोज डोलारे यांची जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
