वाशी (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात दि. 18 जुलै 2026 रोजी शिक्षक-पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी वाशी गावचे माजी सरपंच भाई भगवानराव उंदरे, दादासाहेब चेडे, नेताजी नलवडे, विश्वजीत देशमुख, डॉ. अंकुश डोईफोडे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी तानाजी शिनगारे तर उपाध्यक्षपदी विश्वजीत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, पालक-शिक्षक समन्वय अधिक प्रभावी करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण निर्णय उपस्थित पालकांच्या सहमतीने घेण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. अंकुश डोईफोडे यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व उपस्थित पालकांना समजावून सांगितले. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने या लसीचे फायदे, आवश्यक खबरदारी आणि जनजागृतीची गरज याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक-पालक मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन छबिले यांनी केले. सभेचे इतिवृत्त श्रीधर धारकर यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत यांनी मानले.

 
Top