धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील आठवडी बाजारात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करून नगरपरिषदेच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, ड्रेनेज, पार्किंग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, सीसीटीव्ही तसेच व्यापाऱ्यांसाठी आवश्यक बाजार कट्ट्यांची उभारणी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, धाराशिवचा आठवडी बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक असून दर आठवड्याला हजारो व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक येथे येतात. मात्र, बाजारात आजही स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची अनुपलब्धता, पार्किंगची व्यवस्था नसणे, प्रकाश व्यवस्था नसणे, ड्रेनेजची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव अशा अनेक गंभीर समस्या कायम आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, विश्वास शिंदे, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद एस,राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत,अग्निवेश शिंदे,अझर पठाण,उस्मान कुरेशी, खलील सय्यद, महेबुब पटेल, बाबा मोमीन, जयसिंग पवार, हरिभाऊ शेळके, हरिदास शिंदे  यांच्यासह व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top