धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकसभा मतदारसंघातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील जीर्ण व असुरक्षित वर्गखोल्यांचा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न दाखल केला होता. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या 203 वर्गखोल्यांना 22.19 कोटीचा निधी मंजुर केला आहे. 

केंद्र सरकारच्या उत्तरानुसार, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार धाराशिव लोकसभा मतदारसंघात (धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका) एकूण 287 शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये जीर्ण अवस्थेतील वर्गखोल्या असुरक्षित असल्याची नोंद करण्यात आली आहे. या समस्येच्या निराकरणासाठी केंद्रशासनाची समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनेच्या समन्वयाने धाराशिव मतदार संघासाठी  203 नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामास आर्थिक वर्ष  2025-26 व 2026-27 मध्ये एकूण 22.19 कोटी आर्थिक तरतुदीसह मंजूरी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजीच्या परित्रकाद्वारे राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना आणि कार्पोरेट सामाजिक जबाबदारी  निधीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीर्ण झालेल्या शाळा इमारतींचे सुरक्षा लेखापरीक्षण करून असुरक्षित इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पाडकाम करण्याचे आणि सुरक्षित घोषित होईपर्यंत त्यांचा वापर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शाळांच्या सुरक्षिततेसाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 
Top