धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देत उमरगा व मुरूम येथील शासकीय रुग्णालयांतील गंभीर समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील शीतगृह (फ्रीझर) गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे मृतदेहांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, रुग्णालय प्रशासनालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रुग्णालयातील एम.डी. डॉक्टरांचे रिक्त पद तातडीने भरून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर मुरूम ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ या तीन महत्त्वाच्या विशेषज्ञ डॉक्टरांची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने 20 ते 25 गावांतील हजारो नागरिकांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून उपचार व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचेही काँग्रेसने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा काँग्रेसने या दोन्ही प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद असलेले शीतगृह (फ्रीझर) तातडीने सुरू करणे, रिक्त विशेषज्ञ डॉक्टरांची पदे भरणे व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन,बाबा मोमीन,मन्सूर सय्यद, अतिक मुजावर,दौलत घोलकर, शरीफ हेड्डे उपस्थित होते.
