धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन होत असतानाही महावितरण कंपनीमार्फत शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात, योग्य दाबाने व नियमित वीजपुरवठा केला जात नाही. त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर बसविण्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांत असंतोष आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार दि. 16 जुलै रोजी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयसासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेती हा पूर्णपणे वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग किमान 8 तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होणे अत्यावश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रात्री-अपरात्री वीजपुरवठा केला जात असून तोही अत्यंत कमी दाबाने होत असल्यामुळे पंप सुरू होत नाहीत, विद्युत मोटारी जळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
याशिवाय, राज्य शासनाकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलेले असतानाही महावितरणकडून अनेक ठिकाणी ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांनी लेखी अर्ज करून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवून देण्याची मागणी केली असता त्यांना “मीटर बदलता येणार नाही“ असे सांगण्यात येत आहे. परिणामी अनेक ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा आर्थिक भार सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये या निर्णयाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख रवी वाघमारे, ॲड. संजय भोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
