धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे आरणी, ता. धाराशिव येथील तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संरक्षण भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळेस तातडीने संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) मंजूर करून तिचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर शाळा जंगलालगत असल्याने परिसरात वन्य प्राणी, भटकी जनावरे तसेच अनोळखी व्यक्तींचा मुक्त वावर असतो. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शाळेच्या परिसराची स्वच्छता, शिस्त आणि शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करणेही कठीण होत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळण्यासाठी शाळेस तातडीने संरक्षण भिंत मंजूर करून तिचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून संरक्षण भिंतीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी अपेक्षा ॲड. व्यंकट गुंड यांनी व्यक्त केली आहे.