धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे सुंभा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीतील जीर्ण व धोकादायक झालेल्या जुन्या वर्गखोल्या तात्काळ पाडून त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाळेतील जुन्या वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या असून त्या विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेषतः पावसाळ्यात छत गळणे, भिंतींना मोठे तडे जाणे तसेच इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण सुरू ठेवणे सुरक्षित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सदर जीर्ण वर्गखोल्या तात्काळ पाडण्यात याव्यात आणि त्याच ठिकाणी नवीन, सुसज्ज व सुरक्षित वर्गखोल्यांच्या बांधकामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. व्यंकट गुंड यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
