धाराशिव (प्रतिनिधी)-  पाडोळी (आ.) येथील अनेक वर्षांपासूनचा अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, रूपामाता फाऊंडेशनचे सचिव तथा विश्व हिंदू परिषद धाराशिवचे उपाध्यक्ष ॲड. अजित व्यंकटराव गुंड पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत महावितरणने पाडोळी (आ.) येथील वीज उपकेंद्रातील 5 मेगावॅट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून 10 मेगावॅट क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. त्यामुळे गावातील वीजपुरवठा नियमित, सुरळीत व अधिक सक्षम झाला असून नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दि. 12 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान ॲड. अजित गुंड पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाडोळी (आ.) येथील गंभीर वीज समस्येकडे लक्ष वेधले होते. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मरवरील वाढलेला ताण, पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर होणारा परिणाम तसेच शेती, उद्योग आणि व्यावसायिक कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले होते. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शेती व व्यावसायिक वीजवापरात झालेल्या वाढीमुळे विद्यमान ट्रान्सफॉर्मर अपुरा पडत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महावितरणने आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून 10 मेगावॅट क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला. त्यामुळे पूर्वी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता अधिक स्थिर, नियमित आणि सक्षम झाला आहे. कमी दाबाच्या समस्येतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना, शेतीपंप, लघुउद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि घरगुती वीजपुरवठा अधिक सुरळीत झाला आहे.


व्यापारी व शेतकऱ्यांकडून समाधान

व्यापारी कुंडलिक लांडगे म्हणाले, “पूर्वी वारंवार वीज खंडित होत असल्याने व्यापारावर मोठा परिणाम होत होता. आता नियमित वीज पुरवठ्यामुळे व्यवसाय सुरळीत झाला असून ग्राहकांनाही उत्तम सेवा देता येत आहे.“ शेतकरी राजकुमार झिरमिरे यांनी सांगितले, “कमी दाबाच्या वीजेमुळे पंप सुरू करण्यास अडचणी येत होत्या. नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे आता शेतीसाठी आवश्यक वीज नियमित मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.“ ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत ॲड. अजित गुंड पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. पाडोळी (आ.)सारख्या वाढत्या गावासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठीही हा ट्रान्सफॉर्मर उपयुक्त ठरेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा वीजप्रश्न मार्गी लागल्याने पाडोळी (आ.) च्या विकासाला नवी गती मिळणार असून शेती, व्यापार, शिक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.

 
Top