भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडर व इतर पावडर विक्री प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींवर कारवाई केली असून, या प्रकरणातील कलम 111 मागे घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात भूम पोलिसांनी एक आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर संबंधित आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि त्याला जामीन मिळाला. तसेच या प्रकरणातील आणखी एका आरोपीला जामीन मिळाल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सुरुवातीला भारतीय न्याय संहितेतील कलम 111 लावण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर संघटित पद्धतीने बनावट किंवा रासायनिक दूध तयार करून त्याचा पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारी संघटित टोळी किंवा नेटवर्कविरुद्ध या कलमाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे भूम प्रकरणात हे कलम लावण्यात आल्यानंतर त्याची मोठी चर्चा झाली होती.

मात्र, या प्रकरणातील संबंधितांवर संघटित गुन्हेगारी टोळी किंवा सिंडिकेटच्या स्वरूपातील गुन्हा सिद्ध होत नसल्याने कलम 111 अंतर्गत दाखल करण्यात आलेला एक गुन्हा मागे घेण्यात आल्याचे भूमचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हेमंत टेके (अकलूज) हा पुणे येथील येरवडा कारागृहात अटकेत असल्याचे सांगण्यात आले. भूम पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेऊन भूम येथे आणत अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. या प्रकरणी अन्न भेसळ कारवाई अधिकाऱ्यांनी संघटित पणे गुन्हा सिद्ध झाले असल्यानेच ? कलम 111 लावण्यात आला असल्याचे सांगीतले जात आहे.


 
Top