धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सहकार शिक्षण, प्रशिक्षण व सहकार जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्ह्याची शिखर संस्था असलेल्या व सन 1958 साली स्थापन झालेल्या धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी युवा अभिलाष लोमटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बोर्डाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्वात कमी वयात अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
धाराशिव जिल्हा सहकार बोर्ड ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व सभासद यांना सहकार विषयक शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारी अग्रणी संस्था असून, सहकार चळवळ अधिक सक्षम, आधुनिक व लोकाभिमुख करण्यासाठी संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे.
अभिलाष लोमटे हे सहकार भारती धाराशिवचे जिल्हा महामंत्री, धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव तसेच एकता परिवाराचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सहकार चळवळीतील सातत्यपूर्ण योगदान, प्रभावी संघटन कौशल्य आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीची दखल घेत त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना अभिलाष लोमटे म्हणाले, “धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या माध्यमातून सहकार शिक्षण व प्रशिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. युवकांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविणे, डिजिटल प्रशिक्षणाला चालना देणे आणि सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे हे आमचे प्राधान्य राहील.“
यावेळी उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संचालक म्हणून ओम नाईकवाडी, मनोज पडवळ, अविनाश देशमुख, अँड. प्रकाश मोठे, गोपाळ आदटराव, नेताजी कवठे, बसलिंग गाढवे, धैर्यशील जाधव, विठ्ठल मासाळ, सौ. रतन चौधरी आणि सौ. अपेक्षा आष्टे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
