कळंब (प्रतिनिधी)- तहसील कार्यालय कळंब येथील अनेक कर्मचारी हे दिनांक 23 जून रोजी साडेदहा नंतर उशिरा कार्यालयात येऊन हजेरी नोंदवहीवर स्वाक्षरी करत असल्याचे कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांच्या निदर्शनास आले होते. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेवर न येता उशिरा येऊन हजेरी नोंदवहीवर स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याची तक्रार राहुल मुळे यांनी कळंब तहसीलदार यांच्याकडे दाखल केली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेऊन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी अधिकारी, कर्मचारी यांना उद्देशून परिपत्रक काढले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, शासन निर्णयान्वये कर्मचारी यांची कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.45 करण्यात आलेली आहे. जेवणाची वेळ 1 ते 2 या वेळेमध्ये जास्तीत जास्त अर्धा तास आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेबाबतचे काटेकोरपणे पालन करावे. यापुढे वेळेबाबत पालन न झाल्याचे दिसून आल्यास संबंधिता विरुद्ध नियमानुसार पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. जे कर्मचारी हे उशिरा आलेले आहेत त्यांची लेट रजिस्टरला नोंद घेतली जाणार आहे. ज्या कर्मचारी यांची तीन वेळा लेट रजिस्टरला नोंद झालेली असेल त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा थेट परिपत्रक काढून आदेश दिला आहे.