भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अनेक दूध उत्पादक शेतकरी दूध विक्रीसोबतच दुधापासून खवा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. खवा हे प्रामुख्याने शेतकरी व ग्रामीण भागातील लघुउद्योजकांकडून तयार केले जाणारे दुग्धजन्य उत्पादन आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळतो, दुधाची नासाडी कमी होते आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते.
सध्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला खवा स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पॅकिंग आणि ब्रँडिंग करणे आवश्यक झाले आहे. मात्र पॅकिंग व ब्रँडच्या नावाखाली खव्याची विक्री केल्यास जीएसटीचा अतिरिक्त आर्थिक भार उत्पादक आणि ग्राहकांवर पडतो. त्यामुळे अनेक लहान शेतकरी व खवा उत्पादक पॅकिंग आणि ब्रँडिंग करण्यास पुढे येत नाहीत.
खवा हा शेतकऱ्यांच्या दुधापासून तयार होणारा प्राथमिक मूल्यवर्धित कृषी व दुग्धजन्य पदार्थ असल्याने त्यास जीएसटीमधून सूट देणे आवश्यक आहे. पॅकिंग व ब्रँडिंग हे केवळ उत्पादन सुरक्षित आणि दर्जेदार स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहे. त्यामुळे केवळ पॅकिंग किंवा ब्रँडिंग केल्यामुळे या उत्पादनावर कराचा भार पडू नये. तरी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन आणि जीएसटी परिषदेकडे ठोस प्रस्ताव सादर करावा असे आवाहन चेअरमन, निर्मल मिल्क प्रॉडक्ट असोसिएशन खवा क्लस्टर भूम तालुका विनोद जोगदंड यांनी केले आहे.
