तुळजापूर (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर आणि मिलूप फूड्स प्रा. लि., बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य (मिलेट) लागवड, प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील 115 शेतकरी, महिला व युवकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना,“श्री अन्नातून आरोग्य, रोजगार आणि समृद्धी साध्य होऊ शकते. संशोधक, उद्योजक आणि विस्तार यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल,“ असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रामनी यांनी ऑनलाईन कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे आयोजीत भरडधान्य (मिलेट) लागवड, प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळेत केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील 115 शेतकरी, महिला व युवकांनी सहभाग नोंदविला.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी मराठवाड्यात भरडधान्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. रब्बी ज्वार संशोधन केंद्र, सोलापूरचे डॉ. परशुराम पात्रोटी यांनी भरडधान्य उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात असल्याची माहिती दिली व अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी कसबे तडवळा येथील प्रगतशील शेतकरी महेश जमाले यांचा महाराष्ट्र शासनाच्या 'मानद कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार-2023' मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना मिलेट बियाणे किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी केले.
