भुम (प्रतिनिधी)-  भूम, दि. 14 जुलै 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे आज दिनांक 14 जुलै रोजी राज्यभरातील बसस्थानके, आगार व विभागीय कार्यालय परिसरात राज्यव्यापी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भूम बसस्थानक येथेही वृक्षारोपण सोहळा उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल बागडे व पाणी पुरवठा सभापती श्री. नवनाथ रोकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भूम आगाराचे आगारप्रमुख श्री उल्हास. शिनगारे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री. सुरवसे, गणेश वाघमारे आगारातील माजी सेवानिवृत्त कर्मचारी श्री. पिंपळे व श्री. आठवले तसेच आगारातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना उपस्थितांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती“ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकत, प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. भूम आगारप्रमुख शिनगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. एसटी महामंडळाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 


 
Top