धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनी ज्ञानदा योगेश कुलकर्णी हिची पुणे येथील नामांकित आयटी सेवा कंपनी रेडबेरील टेक सोल्युशन्स प्रा. लि. मध्ये यु एक्स, यु आय डेव्हलपर इंटर्न म्हणून आकर्षक वेतन पॅकेजसह निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात उत्साहासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानदा हिने दहावी व डिप्लोमा या दोन्ही परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केल्या आहेत. शिक्षणादरम्यान तिने सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे जाव्हा डेव्हलपर सर्टिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. तसेच इन्फोसिस च्या 'इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड' या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण व इंटर्नशिप पूर्ण करून आधुनिक सॉफ्टवेअर विकास, यु एक्स/ यु आय डिझाइन आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ज्ञानदा ही मेहनती, हुशार, कष्टाळू आणि जिद्दी विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयात ओळखली जात होती. शैक्षणिक प्रगतीबरोबरच महाविद्यालयातील विविध तांत्रिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांमध्ये तिचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग होता. सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला ही नामांकित कंपनीत संधी मिळाली आहे. रेडबेरील टेक सोल्युशन्स प्रा. लि. ही पुणे (हडपसर-मगरपट्टा) येथील एक अग्रगण्य आयटी सेवा कंपनी असून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड सोल्युशन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा इंजिनिअरिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा पुरविते. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी ज्ञानदा कुलकर्णी तसेच तिचे आई-वडील योगेश कुलकर्णी आणि प्रतिभा कुलकर्णी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळवत असून आकर्षक वेतन पॅकेजही मिळवत आहेत. रोजगार क्षेत्रात स्पर्धा वाढत असली तरी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण कौशल्ये देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.“ महाविद्यालयाच्या उद्योगाभिमुख प्रशिक्षण व प्लेसमेंट धोरणमुळे विद्यार्थ्यांना सर्वोच्च कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने कॅपजेमिनी, टीसीएस, इन्फोसिस यासारख्या नामांकित कंपन्यांच्या इंटर्नशिप व प्रशिक्षण कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. तसेच महाविद्यालयाचा सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटी सोबत कौशल्य विकासासाठी करार असून, त्यामुळे निश्चितच महाविद्यालयाच्या प्लेसमेंट संख्येत व मिळणाऱ्या पॅकेजमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानदाच्या या यशाबद्दल माजी गृहमंत्री संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, सर्व विभागप्रमुख तसेच विभागातील सर्व कर्मचारी व प्राध्यापकवृंदानी मनापासून अभिनंदन केले.
