भूम (प्रतिनिधी)- ईट येथील शेतकरी राजेंद्र भागवत डोके (वय 35) यांचा स्वतःच्या शेतात विद्युत धक्क्याने झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे ऊस पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेताच्या बांधावर तारांचे कुंपण करून त्यास विद्युत प्रवाह जोडला होता. मात्र, नियतीने क्रूर घाला घालत, शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राजेंद्र डोके यांचा नकळत त्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही हृदयद्रावक घटना गुरुवार, दि. 8 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे डोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
रानडुकरांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून पीक वाचविण्यासाठी अनेकदा जीव धोक्यात घालून उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही धोकादायक उपायांचा अवलंब करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
