भूम (प्रतिनिधी)- गेल्या महिनाभरापासून भूम शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न चिघळत चालला असून नागरिकांच्या संयमाचा अंत होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ही सभा शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणार की पुन्हा आरोप-प्रत्यारोपांतच संपणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरवासीयांनी नगराध्यक्षपदासाठी आलमप्रभू शहर विकास आघाडीवर विश्वास दाखवला, तर नगरसेवकांच्या संख्येत जनशक्ती शहर विकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, दोन्ही आघाड्यांतील समन्वयाच्या अभावाचा फटका थेट नागरिकांना बसत असल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे. सर्वाधिक गंभीर प्रश्न म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. कचरा प्रक्रिया केंद्राचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढिग साचले आहेत. “स्वच्छ शहर, सुंदर शहर“ अशी घोषणा करणाऱ्या भूमची आज “कचऱ्याचे शहर“ अशी ओळख निर्माण होण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.