धाराशिव (प्रतिनिधी)- सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित विभागीय बाल नाट्य पारितोषिक वितरण समारंभात यशराज पब्लिक स्कूल, धाराशिवच्या विद्या सरस्वती बाल नाट्य ग्रुपने इतिहास रचला. याच स्पर्धेत त्यांनी पुणे येथील भरत नाट्य मंदिर येथे सादर केलेल्या 'सदाफुली रंगीत झाली' या हृदयस्पर्शी नाटकाने राज्यस्तरावर आपली मोहोर उमटवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परिणामी सहभागी बालकारांनी अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे.
राज्य नाट्य स्पर्धा सोलापूर येथे पार पडली होती. त्या स्पर्धेतून अतिउत्तम कला सादर केल्याबद्दल या बाल कलावंतांचा पुणे येथे नुकताच सन्मान करण्यात आला. धाराशिवसारख्या ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर थेट मुंबई-पुण्यातील नाट्यकर्मींना आव्हान देत पारितोषिक पटकावले, ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. त्यामुळे शासनाने दिलेला हा सन्मान इतर शाळांनाही प्रेरणा देणारा ठरेल. तसेच या यशाने जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवी चेतना निर्माण झाली आहे. लहान वयातच एवढी मोठी झेप घेणाऱ्या या बालकलाकारांमुळे ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
या नाटकातील प्रमुख बालकलाकार कु.विरसिंह मनोजसिंग ठाकूर याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'विजेता बाल कलाकार' म्हणून प्रमाणपत्र व रौप्य पदक देऊन, तर नाटकाच्या दिग्दर्शिका रेखा जेवळीकर यांना विशेष सन्मान म्हणून पारितोषिक व सन्मान प्रमाणपत्र व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विशेषता: विरसिंहच्या सहजसुंदर अभिनयाने परीक्षकांनाही भावविभोर केले. शिवाय प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, तेव्हाच या कलाकृतीचे यश अधोरेखित झाले होते. रेखा जेवळीकर या केवळ दिग्दर्शिका नाहीत, तर यशराज पब्लिक स्कूल संचलित विद्या सरस्वती बाल नाट्य ग्रुपच्या संस्थापकाही आहेत. त्यामुळे शालेय मुलांच्या कलेला योग्य दिशा देण्याचे त्यांचे अविरत परिश्रम फळाला आले आहे.
दरम्यान 'सदाफुली रंगीत झाली' हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर संस्कार आणि मूल्यांची शिकवण देणारे आहे. या नाटकातून बालमनावर होणारे संस्कार, नात्यातील वीण आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. हेच या नाटकाच्या यशाचे गमक ठरले. या ऐतिहासिक यशाबद्दल ओमकार झालटे, मेघा सलगर, आदित्य जाधव, पल्लवी सूर्यवंशी, प्रणिता गरड, अदिती जोशी, सुषमा राऊत, प्राची खेर्डेकर, रवीना कांबळे, बालाजी गरड, जयवंत ओमने, स्नेहा भुतेकर, मधुकर कांबळे यांच्यासह सर्व पालक, शिक्षक आणि जिल्ह्यातील सर्व रसिक प्रेक्षकांकडून दिग्दर्शिका रेखा जेवळीकर, बालकलाकार विरसिंह ठाकूर आणि संपूर्ण नाट्य समूहावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
'सदाफुली रंगीत झाली' - एक दृष्टिक्षेप...
- लेखन व संकल्पना: सामाजिक जाणिवा आणि बालमानसशास्त्र
- विशेष ठरलेले प्रसंग: नाटकातील आजी-नातवाच्या संवाद
- परीक्षकांची प्रतिक्रिया : निरागसता आणि परिपक्वतेचा मिलाफ.
- नेपथ्य व संगीत: पारंपरिक लोकसंगीताचा वापर
दिग्दर्शिका रेखा जेवळीकर : कलेसाठी झटणाऱ्या दुर्गा...
- उद्देश: मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे.
- प्रवास: 8 वर्षांपासून ग्रुपद्वारे निःशुल्क प्रशिक्षण
- प्रतिक्रिया : हा प्रत्येक चिमुकल्याचा सन्मान
- पुढील लक्ष्य : राष्ट्रीय बाल नाट्य स्पर्धेसाठी तयारी
