धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची (दि. 24) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी दत्तात्रय गाडेकर यांची निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची परंडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी मिश्किन यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करून संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.
याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय गाडेकर यांचा धाराशिव जिल्हा काँग्रेस कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नियुक्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, सोमनाथ मिश्कीन यांच्या नेतृत्वाखाली परंडा तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट होईल, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा उभारला जाईल. तसेच दत्तात्रय गाडेकर यांच्या प्रदेशस्तरीय जबाबदारीमुळे ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नूतन तालुकाध्यक्ष सोमनाथ मिश्कीन आणि नूतन प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, विश्वास आप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद, सद्दाम,शेख,सद्दाम काझी,काँग्रेस चे पदाधिकारी,सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
