धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्वसामान्य नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये,त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत व्हावी,यासाठी महसूल प्रशासनाने समाधान शिबिराचे आयोजन केले आहे.शिबिरात ज्या तत्परतेने कामे होत आहेत,त्याचप्रमाणे पुढील काळातही नागरिकांची कामे कार्यालयातून वेळेत झाली पाहिजेत,असे प्रतिपादन कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी केले.

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ओमसाई मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, सभापती कोकणे, राजश्री वरपे, गोकर्णा कदम, उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, कांचन संगवे, पेकराज गाडगे, अजित लाकाळ, मनोज घोगरे, दत्ता माकोडे, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,  अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील तसेच लक्ष्मीबाई म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, कळंब पंचायत समितीच्या सभापती राजश्री वरपे, जिल्हा परिषद सदस्या कांचन संगवे  यांनीही मार्गदर्शन केले.  शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून एकूण 3,545 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. शिबिरात नीट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी केले. आभार धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी मानले.शिबिरास कळंब व धाराशिव तालुक्यातील विविध योजनांचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top