धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी काही भागांत भूगर्भातून गूढ आवाज ऐकू आल्याने तसेच भूकंपासदृश धक्का जाणवल्याच्या माहितीची जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून याबाबतची पडताळणी केली.
राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार,हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील कामटी तांडा येथे आज सकाळी 10.14 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता.धाराशिव जिल्ह्यात काही नागरिकांना जाणवलेला गूढ आवाज हा हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या भूकंपाचा परिणाम असू शकतो,अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.दरम्यान,धाराशिव जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,अशा घटनांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.केवळ प्रशासनाकडून अधिकृतपणे जारी करण्यात येणाऱ्या सूचना व माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि त्याचे पालन करावे.