धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पातील विद्युत वाहिनीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 16.70 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पवनचक्कीच्या तारा चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.
धाराशिव जिल्हयातील पवनचक्कीचे संबधीत असणाऱ्या प्रकल्पातून तेथील विद्युत वाहिनी तारा चोरीस जाण्याचे प्रकार घडत होते. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे अतिसंवेदनशिल व गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस अधिक्षक धाराशिव रितू खोखर यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या अधारे बोरी पाटी पारधी पिढी ता. वाशी येथून 2 संशयीत आरोपींना त्यांच्या महिंद्रा स्कॉपियो व एक अशोक लेलॅन्ड दोस्त वाहनासह ताब्यात घेतले. आरोपींकडे चोकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत मिळुन आंबेवाडी, बरमगाव, लोहारा, कळदेव निंबाळा शिवारात पवनचक्कीच्या प्रकल्पावरील विद्युत वाहिनी तारा चोरी केली असल्याची कबुल केले. आरोपींकडून एकुण 299 किलो वजनाच्या विद्युत वाहिनी तारा व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉपियो वअशोक लेलॅन्ड दोस्त वाहन असा एकुण 16.70 लाख रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, चापोह रत्नदिप डोंगरे यांचे पथकाने केली आहे.
