तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-अक्कलकोट या महत्त्वाच्या मार्गावरील भातंबरी गावासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीने घाईघाईत मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्याच पावसात आणि गावातील पाण्याचा निचरा रस्त्यावरून झाल्याने भरलेला मुरूम वाहून गेला असून खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दिखाऊ दुरुस्तीचा फोलपणा उघड झाला आहे.

रस्त्यावरील खड्डे पूर्ववत झाल्याने ग्रामपंचायतीचा भोंगळ आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तात्पुरती डागडुजी करण्यात आली, मात्र समस्येच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तीव्र नाराजी वाहनचालक आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

सध्या आषाढी वारीनिमित्त या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. अशा परिस्थितीत भातंबरी गावासमोरील मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून वाहनचालकांसह वारकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे रस्ता वारंवार खचत आहे. त्यामुळे केवळ मुरूम टाकून प्रश्न सुटणार नसून कायमस्वरूपी जलनिचरा व्यवस्था उभारून दर्जेदार पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच भातंबरी गावासमोरील रस्त्याचे कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम तातडीने हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.


 
Top